25 जुलैपासून श्रावण सुरु होत आहे. त्यामुळे उपवास, पूजा, व्रत करण्यासाठी हा महिना अगदीच पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यात खाण्या-पिण्याबाबत अनेक नियम असतात. जसं की श्रावणात शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करणे शुभ मानले जाते पण या संपूर्ण काळात दूध किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करणे मात्र निषिद्ध मानले जाते. तसच श्रावणात अशी अनेक फळं आहेत जी खाणे वर्ज्य मानले जाते. कारण त्यामागे शास्त्रीय आणि धार्मिक अशी काही कारणे आहेत.
पण यासोबतच अजून एक पदार्थ श्रावणात खाण्यास मनाई असते किंवा निषिद्ध मानले जाते. तो पदार्थ म्हणजे दह्यापासून बनवली जाणारी कढी. होय श्रावणात दह्यापासून बनवलेली कढी पिणे टाळण्यास सांगितले जाते. पण असं का? चला जाणून घेऊयात यामागे नक्की काय कारणे आहेत ते.
धार्मिक कारणे
भाविक श्रावणात संपूर्ण महिन्यात भोलेनाथाची पूजा करतात. दरम्यान, सावनमध्ये काही खाद्यपदार्थांवर बंदी आहे, त्यापैकी एक म्हणजे कढी. तुम्ही किमान एकदा तरी ऐकले असेल की श्रावण महिन्यात कढी खाल्ली जात नाही. श्रावण महिन्यात दही आणि कढी यासारखे थंड पदार्थ खाऊ नयेत. अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच याचं दुसरं कारण म्हणजे की या गोष्टी शरीरात तामसिकता वाढवतात. म्हणून या गोष्टी खाणे शक्यतो टाळाव्यात असं म्हटलं जातं.
याचं धार्मिक कारण पाहायला गेलं तर असं म्हटलं जातं की, श्रावणात शिवभक्त शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करतात. म्हणून, कच्च्या दुधापासून बनवलेल्या वस्तू खाणे निषिद्ध मानले जाते. दुधाचा वापर दही बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे दह्यापासून बनलेली कढी खाणे टाळावे.
वैज्ञानिक कारणे
याचं वैज्ञानिक कारण काय आहे जाणून घेऊयात. श्रावणात कढी न खाण्याचे वैज्ञानिक कारण आहे हवेतील आर्द्रतेमुळे पचनक्रिया मंदावणे. अशा परिस्थितीत दही आणि कढी सारख्या गोष्टी शरीरासाठी जड ठरू शकतात, ज्यामुळे पोटफुगी, अपचन, गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात. व्यक्तीला शरीराशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. कढीचे सेवन केल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
यामागील अजून एक वैज्ञानिक कारण असेही आहे की श्रावणात भरपूर पाऊस पडतो आणि त्यामुळे सर्वत्र नको असलेले गवत वाढते. त्यावर लहान कीटक असतात आणि गाई गवतासह त्यांनाही खातात. अशा परिस्थितीत, या प्रकारच्या गवताचा गायी आणि म्हशींच्या दुधावरही परिणाम होतो. हेच कारण आहे की सावनमध्ये दूध, दही आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करणे चांगले मानले जात नाही .