देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता आणखी एका योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारने पीएम किसान मानधन पेन्शन योजना (पीएम-केएमवाय) पीएम-किसानशी जोडली आहे. याचा फायदा देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे करावी लागणार नाहीत.
पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत, शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर म्हणजे वृद्धापकाळात दरमहा 3000 रुपये, म्हणजेच वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळेल. महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना यासाठी कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही. पीएम-किसानच्या वार्षिक 6000 रुपयांच्या निधीतून मासिक योगदान कापले जाणार आहे.
वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन
पीएम किसान मानधन पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे किमान वय 18 आणि कमाल वय 40 वर्षे असावे. या योजनेसाठी एकदा नोंदणी केल्यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपयांचे पेन्शन मिळेल. म्हणजेच वर्षभरात 36000 रुपये मिळतील. ही पेन्शन उर्वरित आयुष्यासाठी मिळणार आहे. पेन्शनसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक विशेष पेन्शन आयडी नंबर मिळेल जो तुम्हाला भविष्यातील कामासाठी उपयोगी ठरेल.
या योजनेसाठी नोंदणी कशी करायची?
पीएम किसान मानधन पेन्शन योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात (CSC) जावे लागेल. केंद्रात जाताना आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत न्या. CSC ऑपरेटर तुमच्या कागदपत्रांच्या मदतीने ऑनलाइन फॉर्म भरेल. तसेच ऑटो-डेबिट फॉर्म देखील भरला जाईल. यामुळे या योजनेसाठी लागणारे मासिक योगदान थेट बँक खात्यातून कापले जाईल. तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर ही रक्कम सहाय्याने आपोआप कापली जाईल.
पीएम किसानच्या पैशातून पेन्शन मिळणार
महत्वाची बाब म्हणजे या पेन्शन योजनेत शेतकऱ्यांच्या खिशातून एक रुपयाही घेतला जात नाही. जर एखाद्या शेतकऱ्याने वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच वर्षाला 2400 रुपये थेट पंतप्रधान किसान योजनेच्या रकमेतून कापले जातील. यातून उरलेले 3600 रुपये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळू शकतो.