मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील संभाजी श्यामराव फराटे हे शनिवारी (दि. 30 ऑगस्ट) रात्री 8 वाजता घरी जात होते. या वेळी त्यांच्यावर पाठीमागून बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्या वेळी समोरून येणारे गोरक्ष फराटे यांच्या दुचाकीची लाइट थेट बिबट्याच्या डोळ्यांवर पडल्यामुळे तो घाबरून शेजारील उसात शिरला. त्यामुळे संभाजी फराटे हे थोडक्यात बचावले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरूरच्या पूर्व भागात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. आत्तापर्यंत अनेक नागरिकांवर बिबट्यांनी हल्ला केला असून, काहींचा जीवही गेला आहे. यामुळे ग्रामस्थ सतत भीतीच्या छायेत जगत आहेत. रात्री-अपरात्री अनेकांना बिबटे रस्त्यावर, शेताजवळ किंवा घराजवळ फिरताना दिसत आहेत. वन विभागाने काही ठिकाणी पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावले होते. मात्र, काही दिवसांपासून पिंजरे हटविण्यात आलेले दिसते. त्यामुळे बिबटे पकडण्यासाठीची मोहीम थंडावली असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
बिबट्यांचा बंदोबस्त केव्हा होणार?
सादलगाव, मांडवगण फाटा, वडगाव रासाई, इनामगाव आदी गावांमध्ये सातत्याने बिबट्यांचे दर्शन होत आहे. काही ठिकाणी ते जोडीने फिरताना दिसले आहेत. मागील सहा महिन्यांत 3 ते 4 बिबटे पकडण्यात आले असले, तरी अजूनही या भागात किती बिबटे आहेत, हा प्रश्न अनुत्तरित आहे. बिबटे केवळ डोंगराळ किंवा वनक्षेत्रातच नाही, तर घराजवळील शेतात देखील दिसत असल्यामुळे नागरी वस्तीत दहशत पसरली आहे. सध्या वन विभागाची मोहीम पूर्णपणे थांबलेली दिसते. एखादी मोठी घटना घडल्यावरच ती पुन्हा सुरू होणार का? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.



