आता नोकरीची चिंता मिटली. बॅंकेत काम करण्याची ईच्छा असणाऱ्यांना आता सुवर्ण संधी मिळाली आहे. SBI बॅंकेने नुकतीच क्लर्क पदासाठी भरती जाहीर केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने यासाठी प्रिलिम्स परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.
यामध्ये ६५०० हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एकूण ६५८९ पदे जाहीर झाली आहेत. यामध्ये ५१८० पदे रेग्युलर क्लर्कसाठी तर १४०९ पदे बॅकलॉग अंतर्गत राखीव ठेवण्यात आली आहेत.
एसबीआय क्लर्क भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार एसबीआय क्लर्क ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षा २०, २१ आणि २७ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात येईल. उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेशपत्र मिळणार असून हे प्रवेशपत्र लवकरच एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर प्रसिद्ध होणार आहे. परीक्षेला हजेरी लावणाऱ्या उमेदवारांनी आपले लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे. भविष्यातील सोयीसाठी उमेदवारांनी प्रवेशपत्राचा प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे.
या परीक्षेच्या पॅटर्नबद्दल देखील उमेदवारांना स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. एसबीआय क्लर्क प्रिलिम्स परीक्षेत एकूण १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. या परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी असेल. इंग्रजी भाषेचे ३० प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे ३५ प्रश्न आणि तर्कशक्ती क्षमतेचे ३५ प्रश्न अशा स्वरूपात प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विषयासाठी वेगळा वेळ निश्चित करण्यात आलेला आहे. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची तरतूद असून चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.
तसेच प्रिलिम्स परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार मुख्य परीक्षा आणि भाषा चाचणीसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत १९० प्रश्न विचारले जाणार असून अंतिम निवड ही उमेदवारांच्या कामगिरीनुसार केली जाईल. बँकेत नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.