येथील शाह कॉर्नर परिसरात किरकोळ कारणावरून डोक्यात दगड घालत मारहाण केल्याने एकजण जखमी झाला. रोहन मारुती भांगे (वय २६, रा. साजणी) असे जखमी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साजणी (ता. हातकणंगले) येथील रोहन भांगे आणि त्याचे वडील रंगकाम करतात. बुधवारी सायंकाळी ते दोघे इचलकरंजीतील काम झाल्यावर घरी जात असताना रोहनने वडीलांना एएससी महाविद्यालयाजवळ सोडले व तो नेहरूनगरमध्ये गेला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत तो शाहु कॉर्नर परिसरात पानपट्टीसमोर थांबला असताना किरकोळ कारणावरून आदित्य आवळे (रा. कामगार चाळ), ऋषिकेश वराळे आणि चिन्या वराळे या तिघांनी रोहनला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली, तर आदित्यने रोहनच्या डोक्यात दगड घातल्याने तो जखमी झाला. नागरिकांनी रोहनला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी रोहन याच्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.