शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे घरात ठेवलेल्या पैशांवरून झालेल्या वादातून मुलानेच वयोवृद्ध वडिलांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली.
या प्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाणे (Shahuwadi Police Station) येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी संतोष दाताराम कामेरकर याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गुरुवारी सायंकाळी घरी आला असता त्याने बॅगेत ठेवलेले पैसे घरातील कोणीतरी न विचारता घेतल्याचा संशय व्यक्त केला. यावरून त्याचा पत्नी साधना व वडील दत्तात्रय संभाजी कामेरकर (वय ८३) यांच्याशी वाद झाला. “माझे पैसे मी पुन्हा घरात येण्याआधी द्या, अन्यथा मी कोणाला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देत तो घराबाहेर निघून गेला.
दरम्यान, रात्री उशिरा संतोष पुन्हा घरी परतला. त्यावेळी पत्नी व मुले शाळेतील गॅदरिंग कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. वडील दत्तात्रय हे घरात एकटेच होते. या संधीचा फायदा घेत संतोषने वडिलांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे उचत परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



