ही घटना १८ मार्च २०२५ ते १० जुलै २०२५ दरम्यान एन-९ सिडको परिसरात घडली. संजना देविदास चौधरी व सुयश देविदास चौधरी (रा. ३०२, व्हिस्टा रेसिडेन्सी, बाणेर, पुणे) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर नगर, हडको परिसरातील ३३ वर्षीय तरुण एका कंपनीत काम करतो. त्याची ओळख पुण्यातील संजना चौधरी हिच्याशी झाली. ती व तिचा भाऊ इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय करत आहेत. हातात अनेक कंपन्याने कार्यक्रम आहेत, परंतु पैशाअभावी ते अपूर्ण आहेत. तुम्ही गुंतवणूक केली तर आम्ही मेहनत करू, त्यातून मिळालेला नफा सम प्रमाणात घेऊ असे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी काही कंपन्यांचे वर्कऑर्डर पर्चेस ऑर्डरचे स्क्रीनशॉट, जीएसटी प्रमाणपत्र, आधार, पॅनकार्ड आदी कागदपत्रे दाखवले.
पोलिस ठाण्यात धाव
पैसेही मिळेनात आणि दिलेले चेकही बाऊन्स झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरुणाने सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून बहीण-भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवेगळे इव्हेंट सांगत उकळले पैसे
संजना चौधरीने इव्हेंटसह जीएसटी, व इतर कामांसाठी सुमारे २३ लाख रुपये घेतले. एवढी गुंतवणूक करूनही इव्हेंट तर झालेच नाहीत, उलट ते सर्व बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर त्या तरुणाला पैसे परत करण्याची लेखी हमीही दिली. दरम्यान वेळ उलटून गेल्यानंतर पैसे परत न मिळाल्याने तरुणाने पैशासाठी तगादा लावला. त्यावेळी मात्र चौधरी यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच तरुणाला शांत करण्यासाठी दिलेले चेकही बाऊन्स झाले.




