जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मतदार यादीबाबत (Gokul Dudh Sangh Election) मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल याचिकेवर राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी दिले.
यावरील पुढील सुनावणी २५ मार्चला ठेवली. परिणामी ‘गोकुळ’ची निवडणूक लांबण्याची शक्यता असून, ती पावसाळ्यानंतरच होईल.
सुमारे बाराशे दूध उत्पादक संस्था सभासदांना अपात्र करण्याच्या मुद्यावरून सध्या गोकुळची निवडणूक प्रक्रिया गाजत आहे. वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी सर्किट बेंचमध्ये धाव घेऊन संबंधित संस्थांना अपात्र ठरवावे, अशी मागणी केली.
या संस्थांना अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संदर्भ त्यांनी दिले. येथे सुनावणी सुरू असतानाच गोकुळचे नेते वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथील निकालानंतर आज सर्किटबेंचमध्ये सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी सरकारी पक्षाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, सध्या दुग्ध विभागाच्या कार्यालयात सुमारे हजाराहून अधिक दूध संस्थांनी दाखल केलेले तक्रार अर्ज पडून आहेत. त्याबाबत नेकमे काय करायचे याबाबत दुग्ध विभाग संदिग्ध आहे. आता न्यायालयाच्या निकालाची दुग्ध विभागालाही प्रतीक्षा आहे.
ठराव कोणाकडून घ्यायचे हे निश्चित झाल्यानंतर साधारण तीस दिवसांचा कालावधी ठराव जमा करण्यासाठी जातो. त्यानंतर साधारण तीस दिवस छाननी, हरकत घेण्यासाठी असतात. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यानंतर पावसाळ्यात मतदान होण्याची शक्यता असल्यामुळे निवडणूक पावसाळ्यानंतरच होईल, अशी शक्यता आहे.


