Homeकोल्हापूरनिराशा! 'माधुरी' हत्तीणीचा कोल्हापूर प्रवास आणखी लांबणार; सुनावणीत नेमकं काय घडलं?

निराशा! ‘माधुरी’ हत्तीणीचा कोल्हापूर प्रवास आणखी लांबणार; सुनावणीत नेमकं काय घडलं?

नांदणी मठातील ‘माधुरी’ हत्तीणीच्या पुनरागमनाबाबत सोमवारी (२३ जून) झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या (HPC) सुनावणीत तातडीचा निर्णय न होता आणखी तपासणी आणि अहवालाची प्रक्रिया निश्चित करण्यात आली. त्यामुळे माधुरीच्या कोल्हापूरमधील पुनरागमनासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील हाय पॉवर कमिटीसमोर सुनावणी झाली. या वेळी नांदणी मठाच्यावतीने करण्यात आलेल्या सुविधांची माहिती सादर करण्यात आली.

 

सुनावणीनंतर नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने नांदणी मठात उभारण्यात आलेल्या सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत हाय पॉवर कमिटीचे सदस्य, सेंट्रल झू अथॉरिटीचा एक प्रतिनिधी आणि महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांनी नामनिर्देशित केलेला एक सदस्य असेल.

 

ही समिती नांदणी मठातील सर्व सुविधांची पाहणी करून २० दिवसांच्या आत सविस्तर अहवाल हाय पॉवर कमिटीकडे सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील सुनावणी घेऊन अंतिम भूमिका निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

याशिवाय, वनतारा येथे असलेल्या माधुरीच्या सध्याच्या आरोग्यस्थितीचा सुधारीत अहवाल सादर करण्याचे निर्देश पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मनोहरन यांना देण्यात आले आहेत. तिच्या शारीरिक स्थिती आणि आरोग्यात झालेल्या सुधारणेचा तपशील या अहवालात नमूद करण्यात येणार आहे. माधुरी हत्तीणीच्या वास्तव्याकरिता नांदणी मठात करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करताना पेटाच्या प्रतिनिधींनाही उपस्थित राहण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांच्या उपस्थितीत वस्तुस्थितीची पडताळणी केली जाणार आहे.

 

मठात युद्धपातळीवर तयारी

 

माधुरी हत्तीणीच्या संभाव्य पुनरागमनाच्या पार्श्वभूमीवर नांदणी मठ परिसरात आवश्यक बांधकामे, निवास व्यवस्था आणि इतर सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. मठ प्रशासनाकडून सर्व तयारी युद्धपातळीवर केली जात आहे.

 

HPC च्या निर्णयानुसार आता प्रत्यक्ष पाहणी आणि अहवालानंतरच पुढील सुनावणी होणार असल्याने माधुरीच्या पुनरागमनाचा निर्णय आणखी काही दिवस लांबणीवर पडला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या अपेक्षांना पुन्हा एकदा प्रतीक्षेची किनार लाभली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -