येथील लोहार गल्लीत पावसाच्या पाण्याने भिजून कमकुवत झालेल्या जुन्या घराची भिंत कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उर्मिला उदय कुलकर्णी (वय ३८) असे या महिलेचे नाव आहे. शेजारीच मोबाईलवर गेम खेळत बसलेला तिचा १४ वर्षांचा मुलगा मात्र आश्चर्यकारकरित्या बचावला.
या हृदयद्रावक घटनेमुळे कागल शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
येथील लोहार गल्लीत मामा श्री दिवाण यांचे जुने कौलारू घर आहे. येथे उदय व उमेश कुलकर्णी हे दोन भाचे कुटुंबांसह वास्तव्यास आहेत. घर जुने असल्याने काही ठिकाणी पत्र्याचा वापर करण्यात आला होता. गेले चार-पाच दिवस झालेल्या पावसामुळे या घराच्या भिंती भिजल्या होत्या.
बुधवारी (ता. ८) रात्री उदय हे घरकुल योजनेतून मिळालेल्या दुसऱ्या घरात झोपण्यासाठी गेले होते. त्यामुळे लोहार गल्लीतील घरात त्यांच्या पत्नी उर्मिला आणि त्यांचा मुलगा दिगंबर हे दोघेच होते.
रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास घराच्या मध्यभागातील मोठ्या भिंतीचा वरचा भाग अचानक कोसळला. भिंतीसह छतावरील लोखंडी पत्रे, पोटमाळा आणि मातीचा मोठा ढिगारा उर्मिला यांच्या अंगावर पडल्याने त्याखाली त्या दबल्या गेल्या.

