ताजी बातमी/ऑनलाइन टीम. इचलकरंजी/प्रतिनिधी –
शहरातील पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या नेमिष्टे गँग मधील अक्षय राजेंद्र नेमिष्टे, गणेश बजरंग नेमिष्टे, राजेंद्र गजानन आरगे, शुभम राजेंद्र नेमिष्टे, सुंदर नेमिष्टे (सर्व रा. शेळके गल्ली) या पाचजणांना कोल्हापूर जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असलेल्या आणि नेमिष्टे गँग नांवाने सक्रीय असलेल्या टोळीप्रमुखासह सदस्यांच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इचलकरंजी पोलिस ठाण्याचे प्रभारी निरिक्षक यांनी अक्षय नेमिष्टे, गणेश नेमिष्टे, राजेंद्र आरगे, शुभम नेमिष्टे व सुंदर नेमिष्टे या पाचजणांच्या विरोधात हद्दीपारीचा प्रस्ताव पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केला होता.
नेमिष्टे टोळीने इचलकरंजीसह हातकणंगले तालुका व जिल्हा परिसरात दहशत माजविण्यासह विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची दखल घेत पोलिस अधिक्षक बलकवडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 7 सप्टेंबर 2021 पासून तीन महिन्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
अक्षय नेमिष्टे याच्यासह त्याच्या साथीदारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गावभाग, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, गर्दी, मारामारी, शिवीगाळ, धमकी, गंभीर दुखापत, दरोडा, कट रचणे, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम तसेच साथीचे रोग अधिनियमांचे उल्लंघन आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.