कोल्हापुर जिल्ह्यात ३२८ सराईतांना हद्दपारकाळ्या धंद्यातील कमाई आणि राजकीय आश्रयाने सोकावलेल्या शहर, जिल्ह्यासह परिक्षेत्रांतर्गत दीड हजारांवर समाजकंटकांना पोलिस दलाने ऐन गणेशोत्सवात जोरात झटका दिला आहे. संघटित टोळ्यांच्या म्होरक्यांसह 328 सराईतांना हद्दपार करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अजूनही 250, परिक्षेत्रातील साडेपाचशेवर गुन्हेगार ‘रडार’वर आले आहेत.

अलीकडच्या काळात गुन्हेगारी बोकाळली आहे. क्षुल्लक कारणातूनही धारदार शस्त्रांचा वापर होऊ लागला आहे. म्होरक्यासह टोळीची दहशत निर्माण करायची, याच हेतूने घातक, जीवघेणी शस्त्रांचा वापर सुरू झाला आहे. यादवनगर, राजेंद्रनगर, विचारे माळ, कनाननगर, फुलेवाडी या दाटीवाटीने वाढलेल्या नागरी वस्त्यामध्येही फाळकुटांनी स्थानिक रहिवाशांवर कमालीची दहशत निर्माण केली आहे.

शुक्राचार्यांकडून गुन्हेगारांना मोकळीक!
कोल्हापूरसह उपनगरे कळंबा, पाचगाव, शिंगणापूर, इचलकरंजी, शहापूर, यड्राव, जयसिंगपूर, कुरुंदवाड परिसरात अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हेगार, काळेधंदेवाल्यासह तस्करांना झारीत दडलेल्या शुक्राचार्यांकडून मोकळीक देण्यात आली आहे की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात विघ्नसंतोषी मंडळींवर झटपट हद्दपार करण्याचा बडगा उगारण्याची पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची मोहीम सामान्यांना दिलासा देणारी आहे. दोन दिवसांत शहरातील 95, जिल्ह्यातील 328 तर परिक्षेत्रातील दीड हजारांवर गुंडांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून भविष्यातही कारवाई कठोरपणे राबविण्याचा निर्धार केला जात असला तरी स्थानिक पातळीवर सूचनांचा किती प्रभावीपणे अंमल केला जातो. हे पाहणे गरजेचे आहे.

कायद्याचा धाकच हरवला?
राजकीय आश्रयातून पडद्याआड राहून टोळ्यांना अभय देण्याचा प्रयत्न होत असल्याने सराईत गुन्हेगार सोकावत आहेत. परिणामी कायद्याचा धाक आहे की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यात काळ्या धंद्यातून मिळणार्‍या रसदीमुळे समाजकंटकांचे वाढते कारनामे यंत्रणेलाही आव्हानात्मक बनू लागल्या आहेत.

Leave a Reply

Join our WhatsApp group