शिवरायांचा जन्म कोकणात झाला होता, प्रसाद लाड यांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापले!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भाजपच्या (BJP) नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून वारंवार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्याचे सत्र सुरुच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsinh Koshyari), मंगप्रभात लोढा (Mangaprabhat Lodha), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. हे तापलेले वातावरण अद्याप निवळले नाही तोपर्यंत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरुन वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता पुन्हा राजकीय वातावरण तापले असून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांच्या जन्मस्थळाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोकण महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीने ट्वीट करत प्रसाद लाड यांचा तो व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत ‘दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावाने निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे.’, अशा खरपूस शब्दात राष्ट्रवादीने भाजपचा समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादीने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रसाद लाड पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात की, ‘संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतली. त्यामुळे सुरुवात कोकणात झाली.’ प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.

प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपावर टीका केली आहे. ‘सकाळ झाल्यावर भाजपाचे लोक एक बेताल व्यक्तव्य करत आहेत. प्रसाद लाड यांनी नवा जावई शोध लावला आहे. शिवरायांचा जन्म कोकणात झाला असे ते म्हणतात. महत्वाचे म्हणजे ते स्क्रीप्ट वाचून असे सांगत आहेत. म्हणजे उद्या गुजरात महोत्सव घ्यायचा असेल तर गुजरातच्या लोकांना खुश करण्यासाठी ते शिवरायांचा जन्म गुजरातच्या सुरतमध्ये झाला असे म्हणतील. त्यांचे वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूक समर्थन कारणीभूत आहे. यांनी आता फक्त माफी मागू नये तर नाक रगडून प्रायश्चित्त करावे.’ अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Join our WhatsApp group