शेत जमिनीच्या वादातून दोघांचा खून; चौघेजण गंभीर जखमी : जत तालुक्यातील घटना

कोसारी (ता. जत) येथे शेत जमिनीच्या वादातून भावकीतील एका कुटुंबावर तलवारीसह धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना आज (दि.११) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रशांत दादासो यमगर (वय २४), विलास नामदेव यमगर (वय ४४) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर दादासो नामदेव यमगर (वय ४८), प्रवीण विलास यमगर (वय २०), यशवंत भाऊसो खटके (वय ५२, रा. गुळवंची) यांच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी संशयित आरोपी तानाजी बाबा यमगर, शिवाजी बाबा यमगर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून ते फरार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही वर्षांपासून दादासो नामदेव यमगर व तानाजी बाबा यमगर या एकाच भावकीतील दोन गटात शेत जमिनीच्या हक्कावरून वाद सुरू आहे. आज सकाळी तानाजी यमगर यांनी शेजारील दादासो यमगर यांच्या शेतात विहीर खणण्यासाठी जेसीबी आणले होते. याला दादासो यमगर व त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध केला. यावरून दोन कुंटुंबात वाद झाला. तानाजी यमगर व त्याच्या साथीदारांनी तलवारीसह धारदार शस्त्राने घरी असलेल्या प्रशांत यमगर याच्यावर हल्ला केला. त्यानंतर शेतात गेलेल्या प्रवीण यमगर यांच्यासह अन्य जणांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला प्रशांतचा जागीच मृत्यू झाला तर विलास यांचा उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी पाहणी केली.

Join our WhatsApp group