Friday, June 2, 2023
Homeकोल्हापूरअमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील कोल्हापुरात

अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील कोल्हापुरात

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत असताना त्यांच्या सगळ्यात जवळचे भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील मात्र कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित शाह यांची चंद्रकांत पाटील यांच्यावरची नाराजी अजूनही कायम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमित शाह आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत, तर उद्या म्हणजेच 16 एप्रिल रोजी नवी मुंबईत त्यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद विद्ध्वंसाप्रकरणी केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार वाद रंगला होता. बाबरी मशिद पाडण्यात शिवसैनिक नव्हते असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर पाटील यांच्यावर जोरदार टीका झाली. चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य करुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

दरम्यान या वादानंतर चंद्रकांत पाटील यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांच्याशी मी स्वत: फोनवरुन बोलून गैरसमज दूर करेन, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यासोबत भाजप नेते आशिष शेलार यांनी अमित शाह यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी ते वक्तव्य टाळायला हवं होतं, असं म्हटलं होतं. त्यातच आता अमित शाह यांच्या नवी मुंबईच्या दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील कोल्हापुरात असल्याने चर्चा सुरु झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा हा परिणाम म्हणायचा का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान अमित शाह आजपासून दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आज संध्याकाळी सात वाजता मुंबई विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा भव्य स्वागत होणार आहे. भाजपचे सर्व बड्या नेत्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group