7 तासांत 101 महिलांची नसबंदी…


छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या ठिकाणी डॉक्टरांनी 7 तासांमध्ये तब्बल 101 महिलांची नसबंदी केली. ही घटना उघड झाल्यानंतर अनेक शंका व्यक्त करण्यात येत आहेत. यानंतर राज्य सरकारने डॉक्टर आणि नसबंदी शिबिराच्या संचालकाच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.


या ठिकाणी होतं नसबंदी शिबिर
राज्य आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. आलोक शुक्ला यांनी सांगितले की, विभागाने सुरगुजा जिल्ह्यातील नर्मदापूर गावात नसबंदी शिबिर सुरू केलं आहे. या शिबिरात ऑपरेशनची जबाबदारी डॉ.जिबनुस एक्का यांना देण्यात आली. तर वैद्यकीय अधिकारी आर. एस. सिंहह यांना या शिबिराचं प्रभारी बनवण्यात आलं होतं.
7 तासांत 101 महिलांची नसबंदी
त्यांनी सांगितले की, या गावात 101 महिलांची केवळ 7 तासात नसबंदी करण्यात आल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. तर एका दिवसात जास्तीत जास्त 30 महिलांची नसबंदी करण्याची सरकारची मर्यादा आहे.

ते पुढे म्हणाले, ज्या महिलांना नसबंदी झाली त्यांची स्थिती सामान्य आहे. मात्र, सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन केल्याबद्दल डॉक्टर आणि शिबीर प्रभारी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे.


नसबंदी शिबिरातील अनियमिततेचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पी. एस. सिसोदिया यांनी 29 ऑगस्ट रोजी नसबंदी करणारे डॉ.जीबनूस एक्का आणि ब्लॉक वैद्यकीय अधिकारी, आर. एस. सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कोणत्या परिस्थितीत तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केलं आहे याची चौकशी केली जाते.


छत्तीसगडमध्ये घडलेली ही अशी पहिली घटना नाही. यापूर्वीही अशाच प्रकारचे नसबंदी शिबिर नोव्हेंबर 2014 मध्ये राज्यातील बिलासपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलं होतं. त्यामध्ये एका दिवसात 83 महिलांची नसबंदी करण्यात आली. नंतर त्यापैकी बरेच आजारी पडले. यामुळे 13 महिलांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Join our WhatsApp group