Thursday, April 25, 2024
Homenewsसोलापुरात लॉकडाऊनमुळे व्यापारी बनला दरोडेखोर, कहाणी वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

सोलापुरात लॉकडाऊनमुळे व्यापारी बनला दरोडेखोर, कहाणी वाचून तुम्हीही थक्क व्हाल!


सोलापुरात मागील काही महिन्यात झालेल्या तब्बल 8 घरफोड्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घरफोड्यात चोरीला गेलेला जवळपास 8 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्यात आनंद कोडम या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. मात्र आरोपी कोडम याने चोरीची कबुली देताना जे कारण सांगितलं आहे ते अस्वस्थ करणारे आहे. लॉकडाऊनमुळे एक व्यापारी दरोडेखोर कसा झाला? याबाबत सविस्तर असा हा रिपोर्ट…

सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून घरफोडयांचे सत्र सुरू होते.या घरफोडयांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली अखेर दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या. मात्र आरोपी आनंद कोडम यांनी पोलिसांना दिलेल्या कबुलीत चोरी करण्याचे जे कारण सांगितलं आहे ते ऐकून आपण अस्वस्थ व्हाल. व्यापारात झालेल्या नुकसानामुळे आपण चोरी केल्याचे आरोपी कोडम याने म्हटलं आहे.


आरोपी आनंद कोडम हे 2014 पर्यंत एकत्रित कुटुंबात राहात होते. त्यावेळी सोलापुरातील पूर्व भागात त्यांचा हँडलूमचा कारखाना होता. मात्र 2014 नंतर कौटुंबिक कारणांमुळे तर परिवरातून विभक्त झाले. स्वतःचा टॉवेलचा व्यवसाय करू लागले. लॉकडाऊनच्या आधी या व्यवसायात त्यांची एका व्यापऱ्याकडून फसगत झाली असल्याची माहिती त्यांनी पोलिसांनी दिली आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. अर्थाजन कसं करावं हे काहीच समजत नव्हतं. रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घरं अस म्हणतात तेव्हा एका अपार्टमेंटमध्ये ते काही कामानिमित्त गेले होते. तेव्हा त्यांनी पहिली घरफोडी केली. या घरफोडीची सवयच लागली.


सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7 आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1 अशा एकूण 8 घरफोड्या केल्याची कबुली आरोपी आनंद कोडम यांनी पोलिसांसमोर दिली आहे.

आनंद कोडम हे सराईत घरफोडी करणारे चोर किंवा दरोडेखोर नाहीत. मात्र त्यांच्या चोरी करण्याची पद्धत पाहून सराईत गुन्हेगार देखील थक्क होतील. आनंद कोडम हे श्रमजीवी असल्याने त्यांच्या मनगटात प्रचंड ताकत आहे. नेमका याचाच वापर करून त्यांनी आपल्या हातांनाच शस्त्र बनवलं. अपार्टमेंट दुपारी बंद असलेले फ्लॅट शोधायचं. सकाळी 11 ते 2 च्या सुमारास या अपार्टमेंटमध्ये घुसयाचं आणि हातानेच कुलूप तोडून घरात प्रवेश करायचं. विशेष म्हणजे ज्या आठ घरफोड्या कोडम यांनी केल्यात त्या सर्व घराचे दरवाज्यांना ‘बिड’ धातूचे कुलूप लावण्यात आले होते. त्यामुळे सहज हातानेच त्यांनी ते कुलूप तोडले.


विशेष म्हणजे ज्या ठिकाणी कोडम यांनी घरफोडी केल्यात त्यापैकी एका ही ठिकाणी 10 मिनिटपेक्षा जास्त वेळ तो थांबला नाही. कुलूप तोडल्यानंतर मनात भीती निर्माण व्हायची. कधी एकदा इथून पळून जाणार या भीतीने मिळेल ते साहित्य घेऊन तो पळ काढायचा. त्यामुळे कोणत्याही घरात कपाट फोडल्याचे, तिजोरी तोडल्याचे पोलिसांना दिसून आले नाही.


आरोपी आनंद कोडम कर्जबाजारी झाला होता. याची कल्पना नातेवाईकांना होती. याचा देखील फायदा त्याने या घरफोड्यामध्ये उचलला. त्यानं नातेवाईकांना सांगितलं की बायकोचे दागिने विकून कर्ज फेडतो. त्रयस्थ नातेवाईकांनी सोनाराला शिफारस केल्याने त्याने देखील सोने स्वीकारले. मात्र यातील कोणालाच कल्पना नव्हती की हे दागिने चोरीचे आहेत.
1 सप्टेंबर रोजी केलेल्या घरफोडीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. यामध्ये तोंडाला मास्क लावलेला असल्याने आरोपीची ओळख पटवणे कठीण होते. मात्र रस्त्यावरील दुकानाच्या सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी दुचाकीवरून जात असल्याचे दिसले. दुचाकी मालकाचा शोध घेतला. तेव्हा आरोपी देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकला. बराच वेळ आरोपीची चौकशी केल्यानंतर देखील त्याने कोणतीही कबुली दिली नाही. पोलीस देखील थकले होते. त्यादिवशी जेलरोड पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल आबा वाळके यांचा वाढदिवस होता. शेवटचे प्रयत्न म्हणून ते आरोपी कोडमकडे गेले. त्याला मित्राप्रमाणे केक भरवला. हे पाहून तो भावनिक झाला. आणि केलेल्या सर्व घरफोड्यांची कबुली दिली.


लॉकडाऊनने अनेकांचे उद्योग-व्यवसाय हिरावून घेतलेत. काहींनी जीव दिला, काहीजण अद्यापही सावरण्याचा प्रयत्न करतयात. मात्र आनंद कोडम हा गुन्हेगारीच्या मार्गावर लागला. आज तो तुरुंगात आहे. त्याच्या डोक्यावर आता गुन्हेगाराचा शिक्का बसलाय. न्यायालय त्याच्या बाबतीत योग्य तो निकाल ही देईल. मात्र त्याच्या या गुन्हेगार बनण्याला नेमकं जबाबदार कोण? हे ही विचार करणे गरजेचे आहे. अर्थात गुन्हेगारी कोणत्याच प्रश्नाचं समाधान होऊ शकत नाही हे ही तितकेच खरे..

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -