Homeमहाराष्ट्रमालेगावजवळ भीषण अपघात: बस-ट्रकच्या धडकेत २ महिला ठार, २३ प्रवासी जखमी

मालेगावजवळ भीषण अपघात: बस-ट्रकच्या धडकेत २ महिला ठार, २३ प्रवासी जखमी

मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील दहिवाळ शिवारात बुधवारी अत्यंत भीषण अपघात घडला. भरधाव ट्रक आणि एसटी बस यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोन महिला प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून तब्बल २३ प्रवासी जखमी झाले आहेत.

 

हा अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव वसंत आगाराची नाशिक-पाचोरा ही बस ४० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जात होती. ही बस मालेगावहुन चाळीसगाव कडे जात असताना दहिवाळ शिवारात चाळीसगावकडून येणाऱ्या एका भरधाव ट्रकशी तिची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताची तीव्रता अत्यंत मोठी होती आणि बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ व आक्रोश पसरला. या दुर्दैवी घटनेत इरशाद बी रमजान मणियार (वय ६०, रा. जामनेर) आणि सखुबाई किरण माळी (वय ६५, रा. एरंडोल) या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

 

अपघातात २३ प्रवासी जखमी

 

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना त्वरित मालेगाव येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून, यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. जखमींमध्ये प्रणिता विनोद ततार (४७), राजेन्द्र जगन्नाथ ततार (६३), आशा राजेन्द्र ततार (५७) (सर्व रा. संगमेश्वर, मालेगाव), ऋतुजा शुभम सोनजे (२४, नाशिक), अरमान नजीम पिंजारी (३५, सोयगाव), गोकुळ रामदास भामरे (६५), सुनंदा गोकुळ भामरे (६०) (दोन्ही रा. नाशिक), सुहाना अझीसा (१९), निधा अझीसा (६६) (दोन्ही रा. मालेगाव) आणि रत्नाबाई नाना अहिरे (६०, टिंगरी, मालेगाव) यांचा समावेश आहे.

 

या भीषण अपघातामुळे चाळीसगाव मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघातास नेमके कोण जबाबदार आहे, याचा शोध घेत आहेत.

 

रस्ता बनला मृत्यूचा सापळा…

 

वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे मालेगाव-चाळीसगाव हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुसरीकडे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वळणे आहेत. त्यामुळे या रस्त्याने वाहन चालवताना वाहनधारकांसाठी मोठी कसरत ठरत असते. विशेषतः या रस्त्यावरील दहिवाळ ते कळवाडी फाटा दरम्यानच्या अवघ्या ९ किलोमीटर अंतरात तब्बल ११ धोकादायक वळणे आहेत. या मार्गावर आजवर झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -