Homeकोल्हापूरसीपीआर रुग्णालयात होणार किडनी, यकृत प्रत्यारोपण सुविधा आवश्यक साधनसामुग्री देण्याचे नियोजन; गरजू...

सीपीआर रुग्णालयात होणार किडनी, यकृत प्रत्यारोपण सुविधा आवश्यक साधनसामुग्री देण्याचे नियोजन; गरजू रुग्णांना दिलासा

राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांत उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.

 

त्यासाठी आवश्यक तो निधी व सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे सीपीआर रुग्णालयातही प्रत्यारोपणाची सोय होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

 

शासकीय रुग्णालयात किडनी व यकृत प्रत्यारोपणासाठी नियोजन करावे, त्यासाठी निधी, आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, संचालक पल्लवी सापळे, विविध रुग्णालय आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते.

 

किडनी प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा, ऑपरेशन थिएटर, तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच इतर आवश्यक बाबींची पूर्तता करून शासकीय रुग्णालयांत ही सेवा अधिक सक्षम कराव्यात. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना दिलासा मिळेल.

 

या कामासाठी सैफी आणि जेजे रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. गौरांग शहा, नानावटीमधील यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. गौरव चौबल आणि जसलोक, जेजेमधील यकृततज्ज्ञ डॉ. प्रवीण अग्रवाल विनामोबदला सहकार्य करण्यास तयार आहेत. त्यांना मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात प्रत्यारोपण सुविधा निर्माण करून दिल्या जातील. त्याच धर्तीवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालय अद्ययावत केले आहे. येथेही काही ऐनवेळी लागणारी तांत्रिक साधनसामुग्री उपलब्ध करून प्रत्यारोपणाची सुविधा करण्यात येणार आहे.

 

टप्प्याटप्प्याने सुविधा सक्षम करणार

 

शासकीय रुग्णालयांत अत्याधुनिक प्रत्यारोपण सेवा उपलब्ध झाल्यास राज्यातील गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे किडनी व यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा टप्प्याटप्प्याने सक्षम करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -