Tuesday, December 24, 2024
Homeकोल्हापूरसीपीआर रुग्णालयामधील दोन विभागांत अनागोंदी

सीपीआर रुग्णालयामधील दोन विभागांत अनागोंदी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सीपीआर रुग्णालयातील पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी विभागांतील कामकाज हे अनागोंदीचे दुसरे उदाहरण आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना रोगनिदानासाठी लागणार्‍या चाचण्या करण्याकरिता खासगी लॅबोरेटरीमध्ये जावे लागू नये, याकरिता शासनस्तरावरून या विभागांसाठी अनेक अत्याधुनिक यंत्रांची उपलब्धता करून देण्यात आली. या विभागांकडे तुलनेने मनुष्यबळही उपलब्ध आहे.

परंतु, बर्‍याच वेळेला तपासण्यांसाठी आवश्यक किटस् उपलब्ध होत नाहीत म्हणून तेथील कामकाज ठप्प असते. शिवाय, काम करण्याची इच्छा या आणखी एका मोठ्या समस्येने या विभागांना ग्रासले आहे. यामुळे यंत्रसामग्री उपलब्ध असूनही गोरगरीब रुग्णांना जीव वाचविण्यासाठी खासगी लॅबचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये आर्थिक लूट किती होते, हा तर त्याहून निराळा विषय आहे.

या दोन विभागांमध्ये कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री स्थापित आहे. रुग्णाच्या रक्‍ताच्या नमुन्याच्या बहुतेक सर्व चाचण्या या विभागांमध्ये होऊ शकतात. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बैठकांमध्ये तशी ग्वाहीही दिली जाते. जिल्हाधिकार्‍यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत रोगनिदानाच्या चाचण्यांसाठी रुग्णालयीन यंत्रणा परिपूर्ण असल्याचा दावाही केला जातो. परंतु, प्रत्यक्षात मात्र रुग्ण या विभागात गेला की, नकाराचा पाढा सुरू होतो.

काही मामुली चाचण्या सोडल्या, तर किटस्अभावी चाचण्या होत नसल्याचे सांगितले जाते आणि सरतेशेवटी रुग्णांना खासगी आस्थापनांच्या पायर्‍या चढाव्या लागतात. रुग्णांना असे करण्यासाठी कोण प्रवृत्त करतो? प्रयोगशाळेसाठी आवश्यक किटस्, रिएजंटस् यांच्या उपलब्धतेसाठी किती प्रयत्न केले जातात आणि त्याला वरिष्ठ स्तरावरून किती प्रतिसाद मिळतो याचा अभ्यास झाला, तर नव्याने येणारी अत्याधुनिक यंत्रणा चालविण्यास ही यंत्रणा किती सक्षम आहे, याचे उत्तर मिळाल्याशिवाय राहत नाही.

कोरोनाचे निदान झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या गंभीर रुग्णांसाठी रक्‍ताच्या काही महत्त्वाच्या चाचण्या आवश्यक ठरत होत्या. दैनंदिन स्वरूपात कोरोना मार्कर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या चाचण्यांसाठी खासगी लॅबमध्ये काही हजारांवर पैसे आकारले जात होते. सीपीआर रुग्णालयातच शेकडो रुग्णांच्या उपचारादरम्यान अशा चाचण्या केल्या गेल्या. त्यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध होती; पण नमुने मात्र तपासणीसाठी बाहेर जात होते. असे किती नमुने बाहेर गेले आणि त्यासाठी रुग्णांना किती भुर्दंड सहन करावा लागला, याची सविस्तर माहिती घेतली, तर हा आकडा कोटी रुपयांची मर्यादा ओलांडून जातो. मग रुग्णालयातील यंत्रणेचा उपयोग काय? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

कोल्हापुरात रोगनिदानाच्या क्षेत्रामध्ये रक्‍ताच्या नमुन्यांची तपासणी करणार्‍या मोठ्या लॅब दाखल होऊ लागल्या आहेत. कोट्यवधी रुपयांची भांडवली गुंतवणूक करून बस्तान बसविणार्‍या या लॅब ग्राहक मिळविण्यासाठी सर्व मार्ग चोखाळण्यास तयार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -