Sunday, February 22, 2026
Homeब्रेकिंगराज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर झाली मद्यविक्री

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर झाली मद्यविक्री

देशातील अनेक राज्यांवर कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा परिणाम झाला. काही राज्यांची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे वृत्त समोर आले होते. तर, सर्वाधिक बाधित असूनही योग्य नियोजनाच्या आधारे महाराष्ट्र आणि केरळ सारख्या राज्यांनी संसर्गाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. पण मद्य प्रेमींनी कोरोना लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणावर दारू रिचवल्याचे समोर आले. महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत 2000 कोटींहून अधिक मद्याची विक्री झाली. कोरोनाची दुसरी लाट असलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान राज्यात 17,177 कोटींहून अधिक मद्य विक्री करण्यात आली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2021-22 दरम्यान झालेली मद्य विक्री ही मागील तीन वर्षातील सर्वाधिक मद्य विक्री आहे. वर्ष 2020-21 च्या तुलनेत 17 टक्क्यांहून अधिक आहे. पण, तरीदेखील मागील आर्थिक वर्षाच्या दरम्यान उत्पादन शुल्क विभागाने आपले महसूल उद्दिष्ट साध्य केले नाही. उत्पादन शुल्क विभागाने आर्थिक वर्ष 2021-22 साठी 18 हजार कोटी रुपयांचे महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट गाठले होते. मागील वर्षी 95 टक्क्यांपर्यंत हा महसूल जमा झाला.
उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जवळपास 2157 लाख बल्क लीटर ‘आयएमएफएल’ची विक्री करण्यात आली. हा आकडा कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या दरम्यान घसरून 1999 लाख बल्क लीटर एवढा झाला होता. त्यानंतर राज्यात वर्ष 2021-22 दरम्यान 2358 लाख बल्क लीटर आयएमएफएलची विक्री झाली.
मोठी वाढ बीअर आणि देशी दारूच्या विक्रीत झाली आहे. महामारीनंतर पहिल्यांदाच आयएमएफएलसह बीअर आणि देशी दारुच्या विक्रीत वाढ झाली आहे. बीअर विक्रीत आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झाली होती. तर, बीअर विक्रीत 2021-22 मध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, 2021-22 या वर्षात एकूण मद्य विक्रीत 7 ते 12 टक्क्यांची वाढ दिसून आली. त्याआधी वर्ष 2020-21 मध्ये मद्य विक्रीत घट झाली होती. अनेक वर्षानंतर मद्य विक्रीत घट नोंदवण्यात आली. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सर्व व्यवहार, जनजीवन काही प्रमाणात पूर्वपदावर येऊ लागले होते. त्यानंतर लोकांची दारू खरेदी करण्याची क्षमतादेखील वाढली. शिवाय, लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यामुळे मित्र परिवाराच्या गाठीभेटीदेखील वाढल्यामुळे मद्य विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -