हनुमान चालीसा पठन प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांना मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी पुराव्यासह उत्तर दिले आहे. पोलिसांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली, तसेच मागासवर्गीय असल्याने पाणी देखील दिलं नाही असे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी त्यांचे या आरोपांची पोलखोल करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात राणा दाम्पत्य पोलिस स्थानकात बसून चाहा पिताना दिसत आहे आणि त्यांच्यासमोर पाण्याची बॉटल देखील दिसत आहे.
खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिसांनी आपल्याला वाईट वागणून दिल्याची तक्रार केली आहे. “मी 23 एप्रीलची रात्र पोलीस ठाण्यात काढली. रात्रभर मी पिण्यासाठी पाणी मागितलं, पण मला पाणी देण्यात आलं नाही. मी खालच्या जातीची असल्याने पोलिसांनी मला ते ज्या ग्लासात पाणी पितात त्या ग्लासात पाणी दिलं नाही. पोलसांनी माझ्या जातीचा उल्लेख केला. मला रात्री शौचालयाला जायचं होतं, परंतु माझ्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं, पोलिसांनी मला शिवीगाळ केली. तसेच आम्ही खालच्या जीतीतील लोकांना कर्मचाऱ्यांचं शौचालय वापरु देत नाही असेही पोलीस म्हणाले, मला माझ्या जातीमुळे मुलभूत अधिकारांपासून दूर ठेवण्यात आलं” असे गंभीर आरोप खासदार राणा लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केले आहेत.
दरम्यान मुंबईत मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा वाचन प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा या दोघांना पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची रवानगी भायखळा आणि तळोजा कारागृहात करण्यात. दरम्यान, नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून ठाकरे सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांविरुद्ध गंभीर आरोप करत तक्रार केली आहे.