ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली; युनियन बँकेच्या अंकली (ता. मिरज) येथील शाखेला कर्जदाराने सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. कर्जदारासह तिघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाखा व्यवस्थापक रुपाली आंबेडकर (रा. बस्तवडे, ता. तासगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
आनंद वसंत ढेकणे (वय 45, रा. विटा), विजयकुमार बसाप्पा पाटील (52, सांगली) व तत्कालीन संबंधित बँक अधिकारी (अजून नाव निष्पन्न नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
ढेकणे हा मुख्य संशयित आहे. त्याची आदित्य टेक्सटाईल ही फर्म आहे. या फर्मच्या व्यवसायाकरिता चीन येथून त्याला मशिन खरेदी करायची होती. यासाठी त्याने युनियन बँकेच्या अंकली येथील शाखेत तीन कोटींचे कर्ज घेण्यासाठी कागदपत्रे सादर केली होती. कर्ज घेण्यासाठी त्याने भांबे (ता. सातारा, जि. पाटण) येथील जमीन तारण म्हणून बँकेत ठेवली. या जमिनीची किंमत 473.23 लाख रुपयांची आहे, असे
मूल्यांकन करून घेण्यासाठी विजयकुमार पाटील याची मदत घेतली. पण प्रत्यक्षात या जमिनीची एक कोटी एक लाख 62 हजार 326 रुपये किंमत होते, असे खाते उताऱ्यावरून स्पष्ट झाले होते. तरीही ढेकणेने कर्ज मंजूर करून घेण्यासाठी बँकेच्या पुण्यातील झोन कार्यालयातील अधिकाऱ्याशी संगनमत केले. त्याला कर्ज मंजूरही झाले. 20 मे 2016 मध्ये हे प्रकरण घडले आहे. ढेकणेने बँकेकडून दोन कोटी 70 लाखांचे कर्ज घेऊनही त्याने टेक्सटाईल व्यवसायासाठी मशिन खरेदी केली नाही. स्वत:च्या फायद्यासाठी त्याने कर्ज उचलले. या कर्जाची त्याने परतफेडही केली नाही. बँकेची फसवणूक केली असल्याने सध्या शाखा व्यवस्थापक रुपाली आंबेडकर यांनी फिर्याद दाखल केली.