ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर शहरालगतच्या प्रमुख गावांसह जिल्ह्यातील 480 ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. या प्रभागांसाठी सोमवारी (दि. 6) आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावली जाणार आहे.
प्रारंभी कोरोना आणि नंतर ओबीसी आरक्षण यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यात ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार आयोगाने भूमिका स्पष्ट केली आहे. आयोगाने ग्रामपंचायत प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत याबाबत 29 नोव्हेंबर 2019 रोजी काढलेले आदेश रद्द केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाविनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
जिल्ह्यात जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या पाच तर डिसेंबर 2021 ते डिसेंबर 2022 पर्यंत मुदत संपणाऱ्या 475 ग्रामपंचायती अशा एकूण 480 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया आयोगाने सुरू केली आहे. या ग्रामपंचायतीसाठी प्रभाग रचना अंतिम करण्याचे काम सुरू होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या 480 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती व जमाती, महिला संवर्ग अशा आरक्षणासह अंतिम प्रभाग रचना जाहीर केली.
प्रभाग रचना अंतिम झाल्या आहेत. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. या प्रभाग रचनेच्या आरक्षण सोडत कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. 3) आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाणार आहे. दि. 17 जून रोजी आरक्षणानुसार प्रभाग अंतिम केले जाणार आहेत.
तालुकानिहाय ग्रामपंचायती
करवीर 53, कागल 27, पन्हाळा 50, शाहूवाडी 49, हातकणंगले 39, शिरोळ 17, राधानगरी 67, गगनबावडा 21, गडहिंग्लज 34, आजरा 37, भुदरगड 45, चंदगड 41.