ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी येथून जवळच असलेल्या शहापूर व उपनगरात प्लास्टिक जाळण्याच्या कारखान्यातून उग्रविषारीवायूथेट हवेत मिसळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर तक्रारी वाढल्या आहेत. हा कारखाना ताबडतोब बंद करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन नगरसेविका रूपाली कोकणे, इचलकरंजी मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
शहापूर परिसरात सायझिंग, प्रोसेसच्या चिमणीतून धुराचे लोट आणि त्यासोबत बाहेर येणारे काळेकुट्ट धुलीकण थेट घरात पडत असल्याने आधीच शहापूर परिसरातील रहिवासी वैतागले आहेत. आता त्यात भरीत भर म्हणून प्लास्टिक जाळण्याच्या कारखान्यातील विषारी वायू थेट हवेत मिसळू लागला आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही नगरपालिका प्रशासनाने अजिबात दखल घेतली नाही तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तात्पुरती दमबाजी करतात आणि ‘अर्थपूर्ण’ सोय झाली की कारवाई न करताच निघून जातात. शहापूर परिसरातील शासकीय विश्रामगृह येथे आरटीओ कॅम्प भरवला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना या वायूमुळे त्रास होत आहे.