ताजी बातमी ऑनलाईन टीम
पलूस; पलूस तालुक्यात लहान मुलांना दारू, ताडी, गुटख्याची अल्पवयीन मुलांना सर्रास विक्री होत आहे. प्रामुख्याने तालुक्यात पलूस, कुंडल, रामानंदनगर, दुधोंडी, आमाणापूर, बुर्ली, भिलवडी आदी गावांत बाल न्याय अधिनियमाचा सर्रास भंग होत असल्याचे चित्र आहे. एखादा अपवाद वगळता पानपट्टीचालक, गुटखा व मावा विक्रेते याचा विचार करत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्यावर कारवाई देखील होत नाही. मात्र पोलिसांनी याकडे सोयीस्कर डोळेझाकपणाची भूमिका घेतली आहे.
तालुक्यात हातभट्टी, ताडी, अवैध धंदे यांचे समीकरण चांगलेच जुळलेले आहे. मोठ्या संख्येने अल्पवयीन मुले दारू, ताडी, गुटखा यांच्या व्यसनांमध्ये अडकत आहेत.
तालुक्यात गुटखा मावा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. माव्यात सुपारी, नशिली तंबाखू आणि इतर रसायने वापरून मावा सुगंधी व चवदार बनवला जातो. पलूसमधून तालुक्यात पानपट्टीधारकांना नशिली तंबाखू आणि इतर रसायनांची विक्री केली जात आहे. हे व्यवसायचालक यातून लहान मुलांच्या जीवाशी खेळत आहेत.
तालुक्यात लहान मुलांना हातभट्टी, भेसळयुक्त कृत्रिम गुटखा, घातक नशिले पदार्थ सर्रासपणे विकले जात आहेत. तर या लोकांचा वाईटपणा नको म्हणून कोणीही पोलिसात तक्रार करत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांनी याबाबत कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.