ताजी बातमी ऑनलाईन टीम
करवीर तालुक्यात 2 तर पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, राधानगरी, चंदगड, शाहुवाडी तालुक्यात प्रत्येकी 1 गटाची भर; प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द हरकती सादर करण्यास 8 जूनपर्यंत मुदत
जिह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. याची प्रारुप प्रभागरचना गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसिलदार कार्यालयांमध्ये प्रसिध्द करण्यात आली. या रचनेनुसार जिल्हा परिषदेचे 9 मतदारसंघ वाढले असून ते आता 76 तर पंचायत समितीचे 18 मतदारसंघ वाढले असून ते 152 झाले आहेत. यावर हरकत घेण्यासाठी 8 जूनपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. आज इच्छुक व समर्थकांची कार्यालयांमध्ये लगबग सुरु होती. दरम्यान, वाढीव मतदारसंघांमुळे कोणाला फायदा व कोणाला तोटा होणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
जिह्यातील प्रारुप प्रभागरचनेचा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर, तहसिलदार (निवडणूक) अर्चना कापसे यांनी जाहीर केला. जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुकास्तरावर तहसिलदार कार्यालयांमध्ये प्रारुप प्रभागरचना प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये पूर्वी असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 67 मतदारसंघांमध्ये आणखी 9 (गट) मतदारसंघांची भर पडली आहे. तर 134 पंचायत समितीमध्ये 18 (गण) मतदारसंघांची वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 2 गट व 4 गण हे करवीर तालुक्यात वाढले आहेत. शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, राधानगरी, चंदगड तालुक्यात प्रत्येकी 1 मतदारसंघ वाढला आहे. तर उर्वरीत तालुक्यातील गट व गणांची संख्या जैसे थे आहे. अनेक मतदारसंघात काही बदल झाल असले तरी ते बहुतांश पूर्वीप्रमाणेच दिसत आहेत. तर काही मतदारसंघात पूर्वी असणारी गावे ही लगतच्या तसेच दुसऱ्या मतदारसंघात गेल्याचे दिसत आहे. यामुळे राजकीय समिकरणे निश्चित बदलणार आहे. काहीजणांच्या हे पथ्यावर पडणार आहे. तर काहीजणांना फटका बसणार आहे. त्यामुळे अनेक हरकती येण्याची शक्यता आहे. हरकतींसाठी 8 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.