इस्लामपूर येथे मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने डॉक्टर महिलेची 15 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी तिघांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ज्ञानेश्वर बाबूराव पाटील (रा. नागराळे, सध्या रा. पुणे), स्नेहल संभाजी पवार (रा. कुंडल, ता. पलूस सध्या रा. पुणे), हर्षल डाके (रा.कुंडल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार जानेवारी ते एप्रिल या कालावधीत घडला. या प्रकरणी डॉ. सुवर्णा सतीश यादव (वय 50, रा. शंकर महाराज मठाजवळ, पुणे, मूळ रा. इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, डॉ. सुवर्णा यांचे मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. ज्ञानेश्वर पाटील हे पवेठा मिळवन देतात अशी माहिती डॉ यादव यांना मिळाली.
ज्ञानेश्वर याने प्रवेश मिळवून देण्यासाठी 30 लाख रुपये डोनेशन द्यावे लागेल, असे सांगितले. चर्चेनंतर 24 लाख रुपये देण्याचे ठरले. त्यावेळी 10 लाख रुपयांची रक्कम पाटील याला दिली. दि. 15 मार्चरोजी पुणे येथील घरात डॉ. यादव यांनी साडेसात लाख पाटील यास दिले. प्रवेशपत्र मिळाल्यानंतर 5 लाख रुपये देण्याचे ठरले. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत डॉ. यादव यांनी 19 लाख रुपयाची रक्कम संशयितांना दिली होती, पण प्रवेश न मिळाल्याने डॉ. यादव यांना संशय आला. त्यांनी दि. 19 एप्रिलरोजी त्यांचे दीर शशांक यादव यांना महाविद्यालयात चौकशीसाठी पाठविले. त्यावेळी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे यादव कुटुंबीयांच्या लक्षात आले.
डॉ. यादव यांनी पाटील यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. त्यावेळी त्यांनी मुलीची मूळ कागदपत्रे, 3 लाख 90 हजार रुपयांची रोकड परत केली. उर्वरित 15 लाख 10 हजार रुपयांची रक्कम देण्यास तो टाळाटाळ करू लागला. तसेच दोघांनी फोन बंद ठेवले. स्नेहल याने दिलेला धनादेश बाऊन्स झाल्याने डॉ. यादव यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.