कोल्हापूर येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या बहिणीला दिलेला शब्द आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landage) यांनी पूर्ण केला. वीर भगिनी कल्याणी जोंधळे हिच्या घराचे काम पूर्ण झाले.
तसेच, तिच्या शिक्षणासाठीही धनादेश सूपुर्द करण्यात आला. शहीद ऋषिकेश यांच्या मातोश्री कविता जोंधळे व बहीण कल्याणी जोंधळे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी अरुंधती महाडीक, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, उप महाराष्ट्र केसरी राजाराम मगदूम, कामगार नेते रोहिदास गाडे, खंडू भालेकर, देवराम जाधव,राजू बोत्रे, बाळासाहेब गाडे, अनिल लोंढे, सतिश गावडे, सागर हिंगणे, माजी सैनिक नवनाथ मु-हे, प्रमोद सस्ते आदी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ऋषिकेश जोंधळे वयाच्या 20 व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती झाला. मात्र, अवघ्या दोन वर्षांत त्यांना 21 नोव्हेंबर 2020 रोजी वीरमरण आले. जोंधळे कुटुंबाचा आधार असलेला मुलगा देशसेवेसाठी धारातीर्थी पडला.
दरम्यान, सामाजिक बांधिलकीतून आमदार महेश लांडगे यांनी कोल्हापूरला जात शहीद जोंधळे यांची बहीण कल्याणी हिच्याकडून राखी बांधून घेतली. त्यावेळी शहीद ऋषिकेश आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नातील घर उभारण्यासाठी मदत करणार आणि कल्याणी हिच्या शिक्षणासाठी व पुढील आयुष्यात कोणत्याही अडचणीत पाठिशी उभा राहण्याचा शब्द आमदार लांडगे (MLA Mahesh Landage) यांनी दिला होता.