मैत्रीमध्ये घात झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. अशामध्ये एका जीवलग मैत्रिणीनेच आपल्या मैत्रिणीचे आयुष्य उध्वस्त केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण पूर्वेला राहणाऱ्या एका तरुणीने राहत्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीने 12 वीमध्ये चांगले टक्के गुण पाडून सुद्धा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न सर्वांना पडला होता. अशामध्ये या तरुणीचा मोबाईल तपासला असता पोलिसांना त्यामध्ये सुसाईड नोट सापडली आणि तिच्या आत्महत्येचे जे कारण समोर आले ते ऐकून पोलिसांसोबत सर्वांनाच मोठा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचाराला कंटाळून पीडित तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून सात तरुण लैंगिक अत्याचार करत होते. या तरुणांना मदत करणारी तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून आत्महत्या करणाऱ्या पीडित तरुणीची जीवलग मैत्रीण आहे. आरोपी तरुण पीडित तरुणीला लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल करु अशी धमकी देत तिच्यावर सतत अत्याचार करत होते. या त्रासालाच कंटाळून तिने दोन दिवसांपूर्वी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी काही जण हे कल्याणमधील नामांकित बिल्डरची मुलं असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या कुटुंबीयांकडून आमच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. सनी, विजय यादव, प्रमेय तिवारी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा, काजल जयस्वाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामधील कृष्णा जयस्वाल आणि काजल जयस्वाल हे बहीण-भाऊ आहेत. काजल जयस्वाल ही पीडितेची चांगली मैत्रीण होती. दरम्यान, आत्महत्या केलेल्या तरुणीला बारावीमध्ये 71 टक्के गुण मिळाले होते. तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.