ताजी बातमी ऑनलाईन टीम
पणजी : महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, प्रगतीशील शेतकरी तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचा जयंतीदिन संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. शिवसेनेचे सर्व आमदार आणि सहयोगी आमदार यांच्या उपस्थितीत आज दिवंगत वसंतराव नाईक यांना विनम्रतापूर्वक अभिवादन करण्यात आले. यानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या कृषिदिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा निर्धार केला. तर पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी याबबातची माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्व आमदारांनी महाराष्ट्राला आत्महत्यामुक्त बनविण्याची शपथही घेतली.
केसरकर यांनी सांगितले की, राज्यातील ४९ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यातील ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. एकनाथ शिंदे हेदेखील शेतकरी कुटुंबातून आले आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव आहे, म्हणूनच हा निर्धार करण्यात आला. तर शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी करून उपयोग नाही. त्यासाठी त्यांना मदतीचा आधार देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.