ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, वैद्यकीयसह अन्य अभ्यासक्रमांच्या जेईई, नीट, एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत. व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाच्या प्रतीक्षेमुळे विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू होण्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर उजाडणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याबाबतच संभ-म होता. विद्यार्थ्यांनी परीक्षा अभ्यासासाठी जादा वेळ मागितला होता. त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया होऊन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) अभियांत्रिकीची संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई), वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) जुलै महिन्यात होणार आहे. अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला या अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) ऑगस्टमध्ये होणार आहे. या दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
दरवर्षी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मे महिन्यात सीईटी, नीट, जेईई प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर होऊन प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन ऑगस्टपर्यंत महाविद्यालये सुरू व्हायची. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात 276 महाविद्यालये आहेत. अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, औषधनिर्माणशास्त्र, विधी, शिक्षणशास्त्र विभागाची अनुदानित व विनाअनुदानित 92 हून अधिक महाविद्यालये असून हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात.