तासगाव; येथील सिद्धेश्वर चौकातील स्वरस्वती आनंद या प्रसूती रुग्णालयातून एक दिवसाच्या बाळाचे केलेल्या अपहरणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयित परिचारका स्वाती माने ही वेगवेगळी कारणे सांगत असल्याने पोलिस चक्रावून गेले आहेत.
प्रसूती रुग्णालयातून दोन दिवसांपूर्वी तेथील कर्मचारी स्वाती माने हिने चिंचणी येथील हर्षदा भोसले या महिलेचे एक दिवसाच्या बाळाचे अपहरण केले. सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना बाळ सुरक्षित परत मिळवण्यात यश आले. यावेळी पोलिसांनी संशयित परिचारिका स्वाती माने व तिचा येडेमच्छिंद्र येथील पती जितेंद्र शंकर थोरात या दोघांना अटक केली. तासगाव पोलिस गेली दोन दिवस संशयित माने व तिचा पती जितेंद्र थोरात यांच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. मात्र ती बाळ अपहरणाबाबत वेगवेगळी माहिती सांगून ती दिशाभूल करीत असल्याचे तपासात समोर येत आहे. त्यामुळे पोलिस चक्रावून गेले आहेत.
माने हिचे घोटी (ता.खानापूर) येथील एकाशी विवाह झाला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. पोलिस त्या कथित पतीच्या शोध घेत आहेत. तिचे माहेर मोहोळ (जि. सोलापूर) अशीही माहिती समोर आली असून छबुराव शामराव माने हे तिचे वडील असल्याचे माने सांगत आहे. तिचा पती व वडील छबुराव माने हे पोलिसांच्या सपर्कात आल्यानंतरच अधिक माहिती समोर येणार आहे. त्या दृष्टीने पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.