चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दररोज वीस ते तीस मिलिमीटर पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात 12 मिलिमीटर तर आजअखेर 2324 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली.
गेल्या पंधरा दिवसापूर्वी झालेली अतिवृष्टी आणि सुरू असणारी संततधार यामुळे धरणाची पाणी पातळी वाढली आहे. चांदोली परिसरात पावसाने थोडीफार उसंत घेतली असली तरी पाणलोट क्षेत्रात मात्र संततधार सुरू आहे. 9397 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. यामुळे चांदोली धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. सध्या धरणात 33.34 टीएमसी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी 96.91 आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा 26.46 टीएमसी आहे. जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी चांदोलीत पावसाच्या सरी कोसळत आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे धरण 100 टक्के भरण्यास केवळ एक टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 626.00 मीटर झाली आहे. वीज निर्मिती केंद्रातून 1573 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.