ताजी बातमी ऑनलाईन टीम
बांधकाम व्यावसायिक माणिकराव विठ्ठल पाटील यांच्या खूनाचा अखेर १५ दिवसांनी उलगडा झाला आहे. या प्रकरणी तीन संशयितांना सांगली ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. किरण लखन रणदिवे वय २६ रा कृष्णनगर कारंदवाडी ता. वाळवा, अनिकेत उर्फ निलेश श्रेणीक दुधारकर वय २२ रा. कारंदवाडी ता. वाळवा आणि अभिजीत चंद्रकांत कणसे वय २० रा. कृष्णनगर कारंदवाडी ता. वाळवा या तिघांना अटक करण्यात आली आहे. पाटील यांचे अपहरण करून खंडणी मागण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण करण्यात आले होते. पण मारहाणीमध्ये पाटील हे बेशुद्ध पडल्याने त्यांना वारणा नदीत फेकल्याची कबुली या संशयितांनी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार बैठकीत दिली.
बाबातची अधिक माहिती अशी की, बांधकाम व्यावसायिक माणिकराव पाटील यांना १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास या तिघांनी तुंग येथील भारत शोरूमसमोरील प्लॉट दाखवण्यासाठी बोलवून घेतले होते. पाटील त्याठिकाणी आल्यानंतर निर्जनस्थळ त्यांना नेण्यात येऊन त्यांना मारहाण करण्यात आली यामध्ये पाटील आणि संशयितांमध्ये झटापट झाली. या झटापटीमध्ये पाटील हे खाली पडले. पाटील हे आता आरडाओरडा करणार म्हणून या संशयितांनी हात बांधून त्यांना त्यांच्या स्कोडा गाडीच्या डिकीमध्ये टाकले असता काही वेळानंतर पाटील बेशुद्ध पडले. परंतु संशयितांना ते मयत झाले असल्याचे वाटल्याने त्यांनी पाटील यांना वारणा नदीत फेकून देण्यात आले. तीन दिवसानंतर पाटील यांचा मृतदेह कवठेपिरान येथील वारणा नदीत आढळून आला. त्यावेळी ह्या खूनाला वाचा फुटली. त्या वेळेपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते अखेर पंधरा दिवसांनी हे तिघे संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.