ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या आठवड्यापासून गगनबावडा तालुक्यात ऊनपावसाचा खेळ सुरु झाला आहे. हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, अधूनमधून पडणारा पाऊस, घाटमार्गातील धुक्याची दूलयी हे स्रुष्टी सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला ५५ किमी अंतरावरील गगनबावडा म्हणजे शहरवासीयांना मेजवानीच ठरते. ठराविक काळ नव्हे तर संपूर्ण वर्षभर येथे पर्यटकांची वर्दळ असते. अध्यात्मिक वारसा,ऐतिहासिक पार्श्वभूमी, तलाव, नैसर्गिक नवलाई, घाटमार्ग, डोंगररांगा त्यामूळे गगनबावडा म्हणजे प्रतिमहाबळेश्वर होय. कोल्हापूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील मर्द किल्ले गगनगडास अध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. विश्वगौरव पुरस्कार प्राप्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या वास्तव्याने ही भूमी पावत झाली आहे. स्थानिक लोकांच्या बरोबरच मुंबई, पुणे, रायगड येथील भाविकांची गर्दी होते.
गेल्या आठवड्यापासून तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या डोंगररांगा हिरवाईने नटलेल्या आहेत. काही ठिकाणचे धबधबे आजही कोसळत आहेत. तळकोकण आणि गगनबावडा दरम्यानच्या घाटमार्गातील खोल दऱ्या विविधतेने नटलेल्या आहेत. अधूनमधून कोसळणारा पाऊस, आकाशाच्या दिशेने झेपावणारे धुके, जोराचा वारा हे नयनरम्य, विलोभनिय दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे
आहे.