ताजी बातमी ऑनलाईन टीम
जुन्या वादाच्या रागामुळेच सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथे महाविद्यालयीन तरुण अजित बाबुराव अंगडगिरी (वय १९) याचा धारदार शस्त्राने खून झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाला आहे. खून करणाऱ्या तिघा तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि शहर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. सुफियान फिरोज बागवान (वय १९ रा. १०० फुटी रोड, रज्जाक गॅरेज मागे), सुजित शामराव शिंदे (वय १९ रा. शामरावनगर) आणि सौरभ सदाशिव वाघमारे (वय २० रा. १०० फुटी रोड, एमएसईबी मागे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की मृत अजित अंगडगिरी हा कर्नाळ रस्त्यावरील ऐश्वर्या गार्डन जवळ राहत होता. शहरातील एका महाविद्यालयात विद्या शाखेत पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होता तसेच त्याला फोटीग्राफीचाही छंद होता. पद्माळे फाटा परिसरातून माधवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेत करण्यासाठी घेतले होते. अजित हा आज शेतात औषध टाकण्याचे काम करत होता. त्यावेळी त्याचे कुटुंबियही शेतातच होते. दुपारी चारच्या सुमारास तिघे संशयित तरूण दुचाकीवरून आले. पानपट्टीत अजित विषयी माहिती घेतली. त्यावेळी तो शेतात असल्याचे माहिती मिळाली. तिघे तरूण तिकडे गेले. अजित याला बोलावून घेतले. त्यावेळी तिघा तरूणातील एकाने धारधार शस्त्राने अजित याच्या छातीवर एकच वार केला. त्यात अजित रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर तिघेही पळून गेले. दरम्यान, अजित याचा जागीच मृत्यू झाला. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळावर धाव घेत तत्काळ तपासाची सुत्रे फिरवली. दरम्यान, पोलिसांनी अजितच्या काही मित्रांची चौकशी केली असता कॉलेज कॉर्नर परिसरात असणाऱ्या टोळक्यांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाल्याचे समजले त्यातून पोलिसांनी माहिती काढली असता सुफियान बागवान याच्याशी त्याचा वाद झाल्याची माहिती मिळाली आणि त्याच वादातून खून झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून मध्यरात्रीच्या सुमारास वारणाली आणि तानंग फाटा येथून सुजित शिंदे आणि सौरभ वाघमारे या दोघांना ताब्यात घेतले तर सुफियान बागवान याला मिरज रेल्वे स्टेशन परिसरातून पकडले. तिघांकडे अधिक चौकशी करता त्यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून खून केल्याची कबुली दिली. यानंतर त्यांना अटक करत शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप जाधव, गुंडू दोरकर, संदीप पाटील, झाकीरहुसेन काझी, अक्षय कांबळे, बिरोबा नरळे, सागर लवटे, संदीप गुरव, विक्रम खोत, अनिल कोळेकर, हेमंत ओमासे, सुधीर गोरे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी यांनी केली.