ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : नवरात्रीच्या काळात आदिशक्तीची पूजा केली जाते. त्यासाठी ध्यान करावे लागते आणि ध्यान लावणे गोंगाटात शक्य नसते. त्यामुळे गरबा, दांडियासाठी डीजे, लाऊडस्पीकर यांसारख्या अत्याधुनिक साउंड सिस्टीमची आवश्यकता नाही असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या भक्तांच्या पूजेत व्यत्यय येत असेल किंवा स्वतः भक्त व्यत्यय आणत असेल तर देवीची पूजा होऊ शकत नाही, असे न्या. सुनील शुक्रे व न्या. गोविंद सानप यांनी म्हटले.
‘दांडिया आणि गरबा हे धार्मिक उत्सवाचा अंगभूत भाग असल्याने अजूनही पूर्णपणे पारंपारिक आणि धार्मिक पद्धतीने सादर केले जाऊ शकतात. त्यासाठी लाऊडस्पीकर, डीजेसारख्या आधुनिक साउंड सिस्टीमची आवश्यकता नाही,’ असे मत न्यायालयाने व्यक्त केले. ध्वनीप्रदूषण नियम २००० अंतर्गत ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित केलेल्या खेळाच्या मैदानावर दांडीया, गरबा खेळला जात असल्याने तेथे साउंड सिस्टीमचा वापर करण्यास मनाई करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालय सुनावणी घे होते. या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने नवरात्री काळातील पुजेचे महत्त्व स्पष्ट केले.