अतिवृष्टीमुळे लांबणीवर पडलेल्या मोहोळ तालुक्यातील भीमा (Bhima) सहकारी साखर कारखान्याची (Sugar Factory) निवडणूक (Election) नजिकच्या काळात होणार आहे.
गेली दोन टर्मपासून खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या ताब्यात असलेल्या या कारखान्यावर पुन्हा ‘मुन्नाराज’ येणार की ‘भीमा’च्या बांधावर असलेल्या विठ्ठल व दामाजी या साखर कारखान्यांतील धग येथेही परिवर्तन घडविणार? याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिकांची सर्व सत्तास्थाने ताब्यात घेणारे माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) सोलापुरातील (Solapur) महाडिकांच्या भीमा कारखान्यातही लक्ष घालण्याची चर्चा मोहोळ तालुक्यात सुरू आहे.
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल, मंगळवेढ्यातील दामाजी आणि पंढरपूरच्या हद्दीवर पण मोहोळ तालुक्यात असलेल्या भीमा या कारखान्यांचे आणि पंढरपूर-मंगळवेढ्याच्या आमदारकीचे राजकारण गंमतीशिर आहे. पंढरपुरातून २००९ मधये अपक्ष आमदार झालेले (स्व.) भारत भालके यांनी २०१० ते २०११ च्या दरम्यान हे तीनही कारखान्यांवर सत्ता मिळविली. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे खासदार असताना महाडिक यांचा भीमा कारखान्यातील संघर्ष मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि पंढरपूरचे माजी आमदार ( कै.) सुधाकरपंत परिचारक यांच्याशी होता. आताही तोच संघर्ष महाडिक-परिचारक भाजपमध्ये आल्यानंतरही सुरू आहे. तसेच, पाटील हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, त्यामुळे भाजपच्या छताखाली हे तीनही नेते एकमेकांविरोधात लढणार, हे स्पष्ट आहे.
पवारांची गुगली
या निकालानंतर तत्कालिन कृषिमंत्री शरद पवार हे पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ‘या कारखान्यांच्या निवडणुकीत तुमच्या माणसांचा पराभव झाला,’ असे पवार यांना विचारताच त्यांनी, ‘निवडून आलेली माणसंही आमचीच आहेत,’ अशी गुगली टाकली होती. त्यांच्या या वाक्याचा अर्थ महाडिक २०१४ मध्ये कोल्हापुरातून राष्ट्रवादीचे खासदार, तर भालके हे २०१९ मध्ये पंढरपुरातून राष्ट्रवादीचे आमदार झाल्यावर अनेकांना समजला.
फडणवीसांनी मध्यस्थी केली तर भीमा बिनविरोध
विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीपासून सुरू झालेला व या तीन कारखान्यांपर्यंत येऊन थांबलेला (कै.) भालके यांच्या विजयाचा वारु समाधान आवताडे यांनी २०१६ मध्ये रोखला. दामाजी कारखान्यावर आवताडेंची सत्ता आली आणि ते २०२१ मध्ये आमदार झाले. आता आवताडेंच्या हातून दामाजी कारखाना निसटला आहे. खासदार महाडिक सध्या भाजपमध्ये आहेत. भीमा कारखान्याच्या निवडणुकीत आता त्यांच्या पक्षातील आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्याशी संघर्ष करावा लागणार आहे. पक्षात असलेले माजी आमदार परिचारक व आमदार आवताडे आणि भाजप प्रवेशाच्या चर्चेत असलेले माजी आमदार राजन पाटील यांना विश्वासात घेऊन भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याची संधी महाडिकांसमोर आहे. त्यासाठी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागेल. महाडिक किती मॅनेजमेंट स्कील वापरातात, यावर पुन्हा मुन्नाराज अवलंबून आहे.
महाडिकांकडे गोल्डन संधी
अतिवृष्टीमुळे दीड ते दोन महिने लांबलेल्या निवडणुकीमुळे कामगार अन् सभासदांचा राग शांत करण्याचा गोल्डन चान्स या कारखान्याचे अध्यक्ष महाडिक यांना मिळाला आहे. या संधीचा त्यांनी कसा लाभ घेतला, हे निवडणूक निकालात दिसणारच आहे. विरोधी पॅनेलमध्ये जरी परिचारक आणि पाटील थेट नसले तरीही परिवर्तन घडवताना लोक पर्याय पाहत नाहीत. पाहतात ती राग काढायची संधी, याचा अनुभव खासदार महाडिक, सुधाकरपंत परिचारक, माजी आमदार राजन पाटील यांनी २०११ मध्ये झालेल्या ‘भीमा’च्या परिवर्तनातून घेतला आहे.
सहकारातील परिवर्तनाची लाट
भगिरथ भालके यांच्या ताब्यात असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना निसटला, तर आमदार समाधान आवताडे यांचे संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावरील वर्चस्व मोडीत निघाले. भीमा सोबत अतिवृष्टीत अडकलेला पण न्यायालयातून निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा अगस्ती सहकारी साखर कारखानाही (ता. अकोले, जि. नगर) पिचड पिता-पुत्रांच्या हातून गेला आहे. सहकारी साखर कारखान्यातील परिवर्तनाच्या लाटेत भीमाचे काय होणार? याची मोठी उत्सुकता आहे.
कोल्हापूरच्या राजकारणात आमचं ठरलंय पासून ते आमचं ठरलयं-गोकूळ उरलयं ही प्रत्येक स्लोगन सक्सेस करुन दाखविणारे माजी मंत्री सतेज पाटील भीमा काखान्यात किती लक्ष घालणार? यावरही पुन्हा मुन्नाराज की परिवर्तन हे अवलंबून आहे. सन २०१९ पासून विजयाचा गुलाल हरवून बसलेल्या महाडिक गटाला राज्यसभेच्या माध्यमातून व्हाया मुंबई कोल्हापुरात गुलाल आणावा लागला. सोलापूरच्या भीमा कारखान्यातील निवडणुकीचे पडसाद महाडिकांच्या ताब्यात असलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (कोल्हापूर) निवडणुकीतही उमटण्याची शक्यता असल्याने माजी मंत्री पाटील ‘भीमा’मध्ये ॲक्टिव्ह होऊ शकतात.
दिवाळीनंतर होणार निवडणूक
भीमा कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक सध्या कुठेही पिक्चरमध्ये दिसत नाहीत. आमदार समाधान आवताडे काय करणार? हेही अद्याप स्पष्ट नाही. मोठे नेते जरी पिक्चरमध्ये नसले तरीही भीमाच्या निवडणुकीत दिलीप घाडगे, कल्याणराव पाटील, शिवाजी चव्हाण, जालिंदर लांडे, भैया देशमुख यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तीन दिवस शिल्लक असताना भीमाची निवडणूक थांबली. निवडणुका ज्या टप्प्यावर थांबल्या तेथून निवडणुका घेण्यास राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. भीमाचा सुधारित निवडणूक कार्यक्रम मान्य होऊन आल्यानंतर साधारणत: दिवाळीनंतर भीमा कारखान्याच्या निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे.