ऑक्टोबरचा दुसरा शुक्रवार हा जागतिक ‘अंडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. चांगल्या आरोग्यासाठी, योग्य पोषक तत्वे मिळण्यासाठी रोज अंडे खाण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनी रोज किमान एक अंडे खावे असा सल्ला दिला जातो.
अंड्याचे सेवन अनेक कारणांनी शरीरासाठी फायदेशीर आहे. आज अंड्यांच्या किमती सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या नाहीत. पण अंड्यांचे उत्पादन सुद्धा वाढले आहे. हॉटेल्स, ठेले येथून ही अंड्यांना मोठी मागणी आहे. मुळात जगभराला भेडसावणारी कुपोषणाची समस्या नियंत्रित करण्यासठी अंडे सेवन हा चांगला उपाय मानला जातो आणि त्याविषयी जागरुकता निर्माण व्हावी म्हणून १९९६ पासून जागतिक अंडा दिवस साजरा केला जात आहे.
अंड्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स, खनिजे, मेद तसेच व्हीटॅमीन ए, अमिनो अॅसिडस, लोह यांचे प्रमाण चांगले आहे. फिट राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी अंडे फायदेशीर आहे. अंडे सेवनाने स्ट्रेस कमी होतो, डोळ्यांना लाभ होतो, स्मरणशक्ती वाढते, हाडे मजबूत होतात, केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. गर्भवती स्त्रियांना अंडे गर्भाचे चांगले पोषण होण्यासाठी उपयुक्त आहे.
अति प्रमाणात अंड्याचे सेवन मात्र शरीराला हानिकारक आहे. अति अंडी खाल्ली तर मधुमेह होण्याचा धोका ६० टक्क्यांनी वाढतो. अंड्यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे अनेकदा अतिसेवन केल्याने किडनीचे विकार होतात. पचनशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोज दोन पेक्षा जास्त अंडी खाल्ली जाऊ नयेत तसेच अंडी खाताना ती व्यवस्थित शिजवून मगच खाल्ली जावीत असा सल्ला डॉक्टर देतात.