शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांसाठी अंधेरीची पोटनिवडणूक खूपच प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी आता शिंदे सरकारकडून मतदानादिवशी अर्थात ३ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही जागा शिवसेनेची असल्यानं पक्षाच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोन्हींसाठी ही जागा आपल्याकडेच रहावी यासाठी प्रतिष्ठेची लढाई सुरु झाली. पण उद्धव ठाकरे गटानं या जागी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिल्यानं शिंदे गटाची अडचण झाली. लटकेंच्या उमेदवारीबाबत अनेक अडथळ्यांची शर्यत झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजप ही निवडणूक एकत्र लढत असल्यानं त्यांनी ही जागा भाजपला सोडली. त्यामुळं या ठिकाणी आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तसेच तब्बल २४ अपक्ष उमेदवारांनीही यासाठी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावं याकरता शिंदे-फडणवीस सकारनं सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ३ नोव्हेंबर रोजी मतदानादिवशी या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं या दिवशी अंधेरीतील केंद्रीय-राज्य सरकारी कार्यालये, निमशासकीय, सार्वजनिक तसेच बँकांना सुट्टी असणार आहे.
आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व मतदारसंघात राहणाऱ्या नागरिकांनी या पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे.