ताजी बातमी ऑनलाईन टीम
देशातील सर्वात मोठी हाफ मेरोथॉनच्या आयोजनाखाली पैसे भरून घेऊन तरुणांची फसवणूक करणाऱ्या वैभव भैरू पाटील याने रविवारी सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली. शनिवारी रात्री उशिरा त्याच्यासह पत्नी पूनम वैभव पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोघांनी सुमारे 2500 हुन अधिक स्पर्धकांची 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले होते. या बाबतची फिर्याद कल्लापा मल्लाप्पा तीरावीर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
नेमके काय घडले कोल्हापुरातील वैभव पाटील या तरूणानं शाहूपुरी बेकर गल्ली परिसरात मराठा कमांडो सिक्युरिटी इंटलिजेन्स मॅन पॉवर्स फोर्स या नावानं वेबसाईटवर हाफ मॅरेथॉनची माहिती टाकली होती. तसंच त्या पांपलेटवर एमसीएसएफ वेल्फअर फौंडेशन, कमांडो हाफ मॅरेथॉन 2022 असा उल्लेख करून कोल्हापुरातील तपोवन मैदानावर 16 ऑक्टोबरला मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केल्याची माहिती अपलोड केली होती. वेगवेगळया गटातील विजेत्यांना 30 लाख रूपयांची बक्षिसं दिली जाणार असल्याचं त्यानं जाहीर केलं होतं.
त्यावरून मुंबई,दिल्ली,बिहार,पंजाब,हरियाणा,गुजरात,आसाम यासह विविध राज्यातील मॅरेथॉनपटूंनी जाहीरातीतील मोबाईल क्रमांकावर संपर्क करून,स्पर्धेविषयी अधिक माहिती घेतली.21,10,5 आणि 3 किलोमीटर अंतराची स्पर्धा होणार असून,या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी 1500 ते 2 हजार रूपये फी आकारण्या आली होती.अशा 900हून अधिक स्पर्धकांची नोंदणी या फौंडेशनकडं झाली होती.
स्पर्धेसाठी शनिवारी देशभरातील स्पर्धक कोल्हापुरात दाखल झाले.त्यांनी राहण्यासाठी लॉज,यात्रीनिवास बुक केले.जेवणाखाण्याचा खर्च केला.टाकाळा इथल्या व्ही.टी.पाटील सांस्कृतिक भवनाच्या मैदानावर हे स्पर्धक दिवसभर थांबून होते.मात्र सायंकाळपर्यंत यातील काहींना फक्त टी शर्ट आणि स्पर्धेसाठी चिप उपलब्ध झाली.
त्यानंतर संयोजकांचे फोन स्वीचऑफ झाले.त्यांच्याकडून कोणत्याच हालचाली होत नसल्यानं,सायंकाळी मात्र स्पर्धकात संभ्रमावस्था निर्माण झाली.फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या स्पर्धकांनी वैभव पाटीलच्या संपर्कातील लोकांना धारेवर धरलं.तसेच स्पर्धेची फी,येण्याजाण्याचा खर्च दयावा,अशी मागणी केली.यानंतर स्पर्धकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन वैभव पाटील याच्याविरोधात तक्रार केली.त्यानुसार पाटील याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.