ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इस्माइल श्रॉफ यांचे निधन झाले आहे. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांचे निधन झाले. इस्माइल श्रॉफ यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. इस्माइल श्रॉफ यांच्या निधनामुळे बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत इस्माइल श्रॉफ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्माइल श्रॉफ हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. 29 ऑगस्ट रोजी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. ज्यामुळे त्यांच्या शरीराची उजवी बाजू पूर्णपणे लुळी झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. पण बुधवारी सकाळी 6.40 वाजता इस्माइल श्रॉफ हे त्यांच्या अंधेरी येथील घरी जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांच्या शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.