काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. सध्या ही यात्रा तेलंगणामध्ये असून, काही दिवसांतच ही यात्रा महाष्ट्रात प्रवेश करणार आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. वृत्त वाहिन्यांमध्ये प्रसारित करण्यात आलेल्या बातमी नुसार येत्या 8 नोव्हेंबरला शरद पवार स्वतः या यात्रेत सहभाग घेणार असल्याचे बोलले जात आहे.
राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरुवात केली. काश्मीरला या यात्रेचा शेवट होणार आहे. एकूण 3570 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा काश्मीरला पोहोचणार आहे. भारत जोडो यात्रा उद्या म्हणजेच 6 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून महाराष्ट्रात या यात्रेला सुरुवात होणार आहे. राहुल गांधी 5 दिवस नांदेड जिल्ह्यात वास्तव्यास असणार आहेत. सोमवारी 7 नोव्हेंबरला देगलूर बसस्थानकापासून सकाळी 6:30 वाजता भारत जोडो यात्रेस सुरुवात होईल.