मनोरंजन विश्वात फार कमी वेळात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) आज म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. 7 नोव्हेंबर 1981 रोजी कर्नाटक राज्यातील पुत्तूर येथे जन्मलेल्या अनुष्काचं खरं नाव स्वीटी शेट्टी आहे. तामिळ आणि तेलगू चित्रपटांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुष्काने 2005 मध्ये ‘सुपर’ या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याविषयी काही रंजक किस्से…
अनुष्काने 2005 मध्ये तेलगू चित्रपट ‘सुपर’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. या चित्रपटात ती अक्किनेनी नागार्जुन आणि आयशा टाकियासोबत दिसली होती. यानंतर अनुष्काने तमिळ, कन्नड आणि बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम करत स्वतःला सिद्ध केले आहे. ती दाक्षिणात्य चित्रपटात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
तिसऱ्या वर्गातील मुलांना शिकवायची अनुष्का
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्का मेडिटेशन वर्ग घ्यायची. त्यानंतर ती योग प्रशिक्षक झाली आणि मुंबईत योगाचे वर्ग घेऊ लागली. डॉक्टर आणि इंजिनिअर्सच्या कुटुंबातून आलेल्या अनुष्काचा योगा इन्स्ट्रक्टर होण्याचा निर्णय खुपच आश्चर्यकारक होता. यासह ती तिसऱ्या वर्गातील मुलांना देखील शिकवायची. तिने अभिनेत्री होण्याचा विचार कधीच केला नव्हता.
एकदा अनुष्का तिच्या योगा क्लासमध्ये व्यस्त असताना दिग्दर्शक मेहर रमेश यांची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी पुरी जगनला तिच्याबद्दल सांगितले. त्यानंतर दिग्दर्शक पुरी जगन यांनी घेतलेल्या ऑडिशनमध्ये तिची निवड होत 2005 मध्ये सुपर चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले. यानंतर अनुष्काने महानंदी या चित्रपटात काम केले. या दोन चित्रपटांनंतर, अनुष्काने आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. परंतु, दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या फोन कॉलने तिचे आयुष्य बदलले. राजामौलीने तिला ‘विक्रमार्कुदु’ या चित्रपटात साइन केले आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरत अनुष्काचे आयुष्य बदललं.
या चित्रपटामुळे बनली सर्वात महागडी अभिनेत्री
अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिने तमिळ, कन्नड, हिन्दी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, तिच्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये एसएस राजामौली यांचा ‘बाहुबली’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. या चित्रपटांमुळे ती रातोरात यशाच्या उंच शिखरावर पोहचली आणि ती दक्षिणेतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक बनली.