संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी सारखे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सुमारे दोन लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सांगलीतील संजय नगर भागात घरफोडी करणाऱ्या गणेश विजय डोईफोडे वय 25 राहणार शिवनेरी नगर कुपवाड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घरफोडी सारखे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना सूचना दिल्या होत्या.
त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील आरोपी गणेश डोईफोडे याच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने असून ते घेऊन तो यशवंत नगर चौक वसाहत मार्गे सांगलीकडे जाणार आहे. यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चिन्मय पार्क जवळील मदन भाऊ पाटील उद्यानाजवळ यशवंत नगर येथे सापळा लावला.
त्यावेळी संशयित आरोपी गणेश डोईफोडे हा येताना पोलिसांना दिसला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अंदाजे आठ महिन्यापूर्वी वसंत नगर येथील शाळेजवळील एका बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून आज प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातून दागिने व रोख रक्कम चोरी केले होते. तसेच पंधरा दिवसांपूर्वी अभय नगर येथे दिवसा एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेडरूम मधील तिजोरीतून सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले असल्याचे कबूल केले.
याबाबत संजय नगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर दोन गुन्हे नोंद असल्याचे मिळून आले. घरफोडी आणि चोरीला सर्व मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पोलिसांनी जप्त करून सदर आरोपी आणि मुद्देमाल पुढील गुन्ह्याच्या तपासकामी संजय नगर पोलीस ठाण्याकडे रिपोर्ट वर्ग केले असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी माहिती दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सपोनि प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक विशाल येळेकर, दीपक गायकवाड, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, सुधीर गोरे, राजू मुळे, हेमंत ओंबासे, कुबेर खोत, ऋतुराज होळकर, सचिन जाधव, विनायक सुतार आणि शुभांगी मुळीक यांनी केली आहे.