खरच कायद्याचा आणि संविधानाचा आदर राखायचा असेल आणि कायदा सर्वांना समान असेल, तर सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापल्यापप्रकरणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मिंधे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, विशाल देवकुळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राजेश क्षीरसागर यांचा 24 नोव्हेंबर रोजी झालेला वाढदिवस सध्या वादाच्या भोवऱयात अडकला आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत क्षीरसागर यांनी सार्वजनिक ठिकाणी चक्क तलवारीनेच केक कापला. याप्रकरणी कारवाईची मागणी रविकिरण इंगवले यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात केली होती. मात्र, अजूनही पोलिसांकडून क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणात स्वतः उपस्थित असलेले जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे सनदी अधिकारी असल्याने पोलिसांना इतर पुराव्याची गरज नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले.
राजेश क्षीरसागर यांच्याकडून ही तलवार चांदीची असल्याचे सांगण्यात येत असले, तरी ही तलवार चांदीची असो की सोन्याची, त्याचे काम कापण्याचेच आहे. याबाबत त्यांनी न्यायालयात खुलासा द्यावा. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, तर न्यायालयातून दाद मागू, असे रविकिरण इंगवले यांनी सांगितले.
शिंदे गटात येण्यासाठी क्षीरसागर यांच्याकडून अनेकांना आमिषे दाखविण्यात येत आहेत. गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यापूर्वी क्षीरसागर यांच्यावर डॉक्टरांकडून खंडणी गोळा करण्यासह ज्योतिप्रिया सिंह यांच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीवेळी एका कॉण्ट्रक्टरला खोक्यासाठी मारहाण केलेला व्हिडीओ व्हायरल झाला असून, स्वयंघोषित बनावट धर्मवीर क्षीरसागर यांचा जनतेने पराभव केल्याचे इंगवले यांनी सांगितले. कोणत्याही यंत्रणेमार्फत आपली चौकशी करा. आपल्या मोबाईलमधील पुरावे योग्य वेळी बाहेर काढू, असा इशाराही इंगवले यांनी दिला.
दरम्यान, क्षीरसागर यांच्या वाढदिवशी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. त्यांच्या पुढय़ात जर तलवारीने केक कापण्यात येत असेल, तर पालकमंत्र्यांनी माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्हाधिकाऱयांसह पालकमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.