उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या गटातील आमदार एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. यादरम्यान आता शिंदे गटाचे नेते व प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी खासदार संजय राऊत यांना जनतेतून निवडणूक लढवून जिंकून दाखवावी असे आव्हान दिले आहे.
काय म्हणाले भरत गोगावले?
आमच्या मतांवर निवडून आलेल्यांनी आमच्यावर टीका करू नये, त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानावेत. शिंदे यांनी आम्हाला सांगितले राऊतांना निवडून द्यावे, नाहीतर त्याच वेळी यांचा करेक्ट कार्यक्रम झाला असता. खासदार संजय राऊत यांनी जनतेतून खासदारकी लढवून निवडून येऊन दाखवावे अशी टीका शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी केली आहे. यावेळी त्यांनी दीपक केसरकर यांच्या विधानाचे समर्थनदेखील केले.
संजय शिरसाटांवर शिंदे गट नाराज
बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाची केटरर्सला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ‘आपण एका जबाबदार व्यक्तीचे चिरंजीव आहोत असं करणे योग्य नाही’ असं म्हणत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाला सल्ला दिला आहे.