ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारतीय क्रिकेट जगतातून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू विराट कोहली या खेळाडूंना भारतीय टी20 संघाचे दरवाजे कायमचे बंद होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमधील लाजीरवाण्या पराभवानंतरच रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी धोक्याची घंटा वाजली होती. पण आता याचे संकेत खुद्द प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले आहेत.
रोहित, विराट एकदिवसीय-कसोटीपुरता
राहुल द्रविड यांच्या दाव्यानुसार रोहत शर्मा आणि विराट कोहली आता केवळ एकदिवसीय आणि कसोटी संघापुरते मर्यादित राहतील. यावर्षीच्या अखेरीस एकदिवसीय वर्ल्ड कप होणार असून भारतातच या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. तसंच टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामने खेळायचे आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ही कसोटी मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
हार्दिककडो सोपवणार जबाबदारी
रोहित आणि विराट आपला शेवटचा टी20 सामना वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये खेळले होते. या सामन्यात टीम इंडियाला तब्बल 10 विकेटने पराभव स्विकारावा लागला होता. यानंतर भारतीय टीम न्यूझिलंडविरुद्ध टी20 मालिका खेळली, ज्यात कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली. आता हार्दिक पांड्याच्याच नेतृत्वात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. त्यामुळे आगामी काळात हार्दिक पांड्याच टी20 चा कर्णधार असेल हे स्पष्ट झालं आहे.