Friday, August 1, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात येताय तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना देऊन या; संजय राऊत यांचं पंतप्रधान...

महाराष्ट्रात येताय तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना देऊन या; संजय राऊत यांचं पंतप्रधान मोदी यांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे. पंतप्रधान मोदी दुपारी मुंबईत येऊन विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. यावेळी ते एका जनसभेलाही संबोधित करणार आहेत. मुंबईत येण्यापूर्वी ते कर्नाटकाच्या दौऱ्यावर असणार आहेत. कर्नाटकातून ते मुंबईत येतील. त्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला डिवचले आहेत. कर्नाटकातून येत आहात तर तिथल्या मुख्यमंत्र्यांना सूचनाच देऊन या. मराठी बांधवांवर अत्याचार करू नका, असं सांगून या, असं आवाहन संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

बेळगावसह सीमाभागात मराठी बांधवांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे कर्नाटकातून येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या संदर्भात तिथल्या मुख्यमंत्र्यांना सूचना द्याव्यात. तसेच महाराष्ट्रात आल्यावर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना दिल्याची घोषणा करावी. या पुढे बेळगावातील मराठी बांधवांवर अत्याचार करू नका, अशा सूचना मी पंतप्रधान म्हणून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत, असं सांगावं. आम्हाला आनंद होईल, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला आहे.

तर राजकीय भाष्य करू
पंतप्रधानांचं स्वागत नेहमी केलं पाहिजे. ते मुंबईत येत आहेत. चांगली गोष्ट आहे. त्यांना कुणाचा विरोध नाही. राजकीय गोष्ट असेल तर बोलू. शिवसेनेने जी कामं केली आहेत, त्याचं उद्घाटन करण्यासाठी भाजपने मोदींना बोलावलं. शिवसेनेने कोणती कामे केली आहेत आणि मोदी त्यातील कोणत्या कामांचं भूमिपूजन करणार आहे हे मी मोजून सांगेल. नाही तर आमचे माजी महापौर सुनील प्रभू यांना विचारा तेही सांगतील, असं राऊत म्हणाले.

हे शिवसेनेचं यश

अनेक प्रकल्पाची योजना, पायाभरणी आणि सुरुवात आम्ही केली होती. त्यातील काही प्रकल्प आता पूर्ण झाले आहेत. त्यापैकी प्रमुख योजनांचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान येत आहेत. हे शिवसेनेचं यश आहे. हे भाजपच्या प्रचाराचं भूमिपूजन आहे, असंही ते म्हणाले.

पक्षीय मतभेद तरी सहभागी होणार
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केलं. भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात मी जातोय. राहुल गांधी यांचं अखंड भारताचं स्वप्न आहे. भारत काश्मीरपासून कन्याकुमारीपासून एक आहे.

त्यामुळे या अखंड हिंदुस्थानवर शिवसेनेची पावलं उमटली पाहिजे. त्यामुळे सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत आम्ही त्या यात्रेत सहभागी होणार आहोत, असं ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -